नवी मुंबईतील विमानतळाला ज्यांचे नाव देण्याची मागणी होतेय ते दि.बा.पाटील नेमके आहेत तरी कोण ?

d.b.patil

मुंबई – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. रिपाईसोबतच अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

दरम्यान, हा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या या लोकनेत्याचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलन देखील आज करणार आहेत.

माजी आमदार माजी खासदार रायगड चे थोर भूमिपुत्र नेते दिवंगत दि बा पाटील हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते होते. विधीमंडळ आणि लोकसभेत शेतकरी आणि कामगारांचा आवाज म्हणून ओळख असणा-या ‘दिबां’नी कारावासही भोगला होता. त्यांनी पनवेलचे नगराध्यक्ष, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोनदा खासदार अशी अनेक पदे भूषविली होती. नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी दिलेला लढा विशेष उल्लेखनीय ठरला.

१६ ऑगस्ट १९९९ रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या मुद्देसूद मांडणीमुळे सत्ताधा-यांमध्येही त्यांच्याविषयी मोठा आदर होता. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील आगरी समाजात त्यांना मोठा मान होता. दि. बा. पाटील हे फक्त आगरी, कोळी, समाजाचे नेते नव्हते तर ते फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील बहुजनांचे नेते होते.

दि बा पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा संबंध होता.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाला त्यांचा पाठिंबा सहभाग होता. कोकण मध्ये शिक्षण प्रसारात दिबांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि बा पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळा ला दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP