महाआघाडीत मनसे नको म्हणणारे काँग्रेसवाले,आता राज ठाकरेंची सभा घ्या म्हणतात : पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा- महाआघाडीमध्ये मनसेला घेण्यास विरोध करणारी कॉंग्रेसच्या लक्षात आता मनसेची ताकत आली आहे अशी चिन्ह दिसू लागली आहेत.आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. ठाकरे यांनी काही लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहोत, असे सांगितले आहे. म्हणून आम्ही काही सूचना दिल्या आहेत. काँग्रेस राज ठाकरेंबाबत अनुकुल नव्हती, मात्र आता तेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या. राज ठाकरेंना सोबत घ्यायला हवं होतं, असंही पवार म्हणाले.

राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील अशी माहिती समोर येत आहे. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे.

दरम्यान,अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.