fbpx

प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्या गुंडांना कॉंग्रेसने केली पुन्हा पदे बहाल

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षामध्ये महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या गुंडांना जास्त महत्व दिले जात असल्याचे म्हणत आपल्याच पक्षावर तोफ डागली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर पत्राचा फोटो ट्वीट करत आपली नाराजी जाहीररीत्या मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे प्रियंका चतुर्वेदी पक्षातर्फे राफेल विमान कराराबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी स्थानिक मुजोर कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले. मुद्दा चर्चेत येवू लागताच निलंबनाची कारवाई केल्याचा दिखावा कॉंग्रेसकडून करण्यात आला. मात्र फक्त या घटनेची निंदा करत या गुंडांना पुन्हा आपले पद देण्यात आले.

प्रियंका यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे की, मेहनतीने पक्षामध्ये स्थान मिळवणाऱ्यांऐवजी गुंडांना जास्त महत्त्व दिले जात आहे. पक्षासाठी मी शिव्या खाल्ल्या परंतु त्यानंतरही पक्षातील लोकांनी मला धमकी दिली. जे लोक धमकी देत आहेत, ते वाचले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न होणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.