शहरी नक्षलवाद : पुणे पोलिसांनी मुसक्या आवळलेले आनंद तेलतुंबडे नेमके कोण आहेत?

मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉ. आनंद तेलतुंबडेला आज पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन तेलतुंबडेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. काल पुणे न्यायलयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
आनंद तेलतुंबडेवर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेला पुण्याला घेऊन गेले असून, आज न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे

आनंद तेलतुंबडे हे विचारवंत असून ते दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

काही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केलं.त्यांनी IIT खरगपूरलाही अध्यापन केलं असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 26 पुस्तकं लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर त्यांनी सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.आनंद तेलतुंबडे हे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती आहेत.