औरंगाबाद जिल्हा परिषदेत काम करतांना मिरासदार, पाटील यांच्या कथेतले ‘इरसाल नमुने’ भेटले- मंगेश गोंदावले

dr. mangesh gondavale

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेत काम करतांना द. म. मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथेत ऐकलेले गावाकडचे ‘इरसाल नमुने’ मला याठिकाणी प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळाली. हे अनुभव माझ्यासाठी नवीनच होते. यातून बरेच काही शिकता आले. विक्रीकर विभागातुन बदलीनंतर पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मिळाली. जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदवले जिल्हा परिषद सदस्यांसंदर्भात आपले अनुभव व्यक्त करतांना बोलत होते.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा पंचायत समिती औरंगाबाद येथे बुधवार (दि. १३) आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषदच्या वतीने तब्बल एक महिन्यानंतर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपस्थित सदस्यांनी गोंदवले यांच्या कामाचे कौतुक करत निरोप समारंभाला उशीर झाल्याबद्दल सदस्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण म्हणाल्या की, विविध ठिकाणी काम करत असताना अधिकारी तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करून इतर ठिकाणी जात असतांना त्या रुजवाव्या असे डॉ. गोंदवले यांचे काम आहे.

अर्थ व बाधकाम सभापती किशोर बलांडे यांनी जिल्हा परिषद प्रशासकीय नवीन इमारतीच्या पायाभरणी पर्यंत डॉ. गोंदवले पदावर असायला हवे होते, अशी खंत व्यक्त केली. रामु शेळके म्हणाले की, किती धावा केल्या त्याला अर्थ नाही तर किती चेंडू मध्ये किती धावा केले याला महत्त्व आहे, अशा अल्पशा कार्यकाळात गोंदावले यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत चांगली कामे केली. सत्काराला उत्तर देताना गोंदवले म्हणाले की, प्रशासकीय काम करताना अनेक सदस्यांची वादविवाद झाले परंतु तो वाद त्या कामापुरता होता.

फेब्रुवारी २०२० ला सीईओ पदाचा पदभार स्वीकारताच कोरोनाला सामोरे जावे लागले. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे करता आलेली नाही. जिल्ह्यात घरकुल धोरणांच्या बाबतीत चांगल कामकाज झाले असून यात विभागातून जिल्ह्याला प्रथम पारितोषिक मिळाले. परंतु माळीवाडा येथील नागरिकांसाठी पक्के घर करण्याचा प्रस्ताव पूर्ण झाला नाही. तर झकास पठार सारखी अनेक राहिलेली कामे नवे सीईओ पुर्ण करतील अशी आशा गोंदवले यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या