असदुद्दीन ओवैसींवर भर सभेत फेकली चप्पल

मुंबई: मुंबईतील नागपाडा भागामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेत राडा झाला आहे. मंगळवारी रात्री एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्या उपस्थितीत असदुद्दीन ओवैसींचं भाषण सुरु होतं. त्याचवेळी ओवैसींच्या दिशेनं काही जणांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ गोंधळीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ओवैसींना काही काळ भाषण थांबवावं लागलं.

”तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला. तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लिमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही”, असे या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी सांगितले.

चप्पल फेकणाऱ्याबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचं अनुकरण करणारे आहेत. तसेच तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत मांडले जात असताना काँग्रेससह सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते गप्प होते. केवळ एमआयएमनेच या मुद्द्यावर मुस्लिमांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. या वेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलिल यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...