‘मराठा समाजाला ओबीसींचा पाठींबा असताना काही व्यक्ती समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत’

chhagan bhujbal

पुणे : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.

अशातच ओबीसी समाज देखील ओबीसी आरक्षण अबाधित राहावं यासाठी आक्रमक झाला आहे. याच संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाही. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिले गेले. त्यानंतरपुन्हा फडणवीस सरकारने त्यासाठी दुसरा कायदा केला. त्याला देखील आपण पाठींबा दिला असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे,’ अशी भूमिका आपण मांडली असल्याचं ते म्हणाले.

तर, ‘ही सर्व पक्षीय भूमिका असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने नेहमीच मराठा आरक्षणाला पाठींबा दिलेला आहे. ओबीसी समाज हा नेहमीच मराठा आरक्षणाला सपोर्ट करत असतांना समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हा लढा वेगळ्या दिशेने जोतोय कि काय अशी परिस्थिती आहे.’ अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली. महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज पुणे समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा हा कोरोनाचे सर्व नियम पालन करत पार पडला. या आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या