राज्याचे विधिमंडळ कि प्राणिसंग्रहालय ? सभागृहाला काही पावित्र्य आहे की नाही

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे विधिमंडळ हे प्राणिसंग्रहालय आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारले आहे. राज्यात तूर घोटाळा झाला असून सरकार घोटाळेबाजांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही केला आहे.

अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, विधिमंडळ प्राणिसंग्रहालय आहे का? उंदीर, मांजर, वाघ, सिंह हे प्राणिसंग्रहालयात असतात. सभागृहाला काही पावित्र्य आहे की नाही. ज्या ठिकाणी आपण कायदे तयार करतो, जेथून राज्याचा कारभार हाकला जातो, जेथून सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते. समाजातील वंचित वर्गाला पुढं कसं आणता येईल, हे ठरवले जाते, तिथे खुशाल प्राणिसंग्रहालय असल्यासारखी भाषणं दिली जातात, असा टोला त्यांनी लगावला.

या आधी अजित पवार यांनी कर्ज माफ झालेले संभाजी पाटील निलंगेकर हे सरकारचे जावई आहेत का? असा खडा सवाल विचारला होता. तर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या संपूर्ण कालावधीत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी चिक्की ते उंदीर घोटाळे करण्यावर भर दिला आहे. त्या घोटाळ्याचे पुढे काही झालं नाही. असं म्हणत अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला होता.