जिथून उभं राहायचं नाही तिथं सुद्धा जावं लागतं; पवारांची तिसरी पिढी ‘ऍक्टिव्ह’

'डायलॉग विथ रोहित पवार' च्या माध्यमातून रोहित पवार यांची युवकांच्या प्रश्नांना साद

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तिसरी पिढी आता चांगलीच ऍक्टिव्ह झाल्याच पाहायला मिळत आहे. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘डायलॉग विथ रोहित’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नाला साद घालत त्यांच्या विविध प्रश्नांची बेधकड उत्तरे दिली. त्यामुळे रोहित पवार यांनी आपले राजकीय मैदान तयार करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

या कार्यक्रमात बोलत असतांना रोहित पवार यांनी मोठं व्हायचं असेल तर जिथून उभं नाही राहायचं तिथं सुद्धा जावं लागतं अस सूचक वक्तव्य करत ‘मुंबई अभी दूर नही’ चे संकेत दिले आहेत.

पवार आडनावाचा फायदा काय होतो असा प्रश्न एका युवकाने विचारल्यानंतर रोहित पवार म्हणाले की, पवार साहेब सरळ मदत कधीही करत नाहीत, त्यामुळे पवार साहेबांच हेच म्हणणं असत की तुम्ही स्वकर्तुत्वाने सिद्ध व्हा ! त्यामुळे पवार आडनावाचा फायदा फक्त कोणी शेवटच्या रांगेत बसवलं नाही इतकाच झाला.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपली विधानसभेची जागा पुतण्यासाठी सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्याला अनुसरून रोहित पवार यांचे आजचे वक्तव्य चांगलेच चर्चेचे ठरले आहे. त्यामुळे बारामती विधानसभेची जागा काकाला की पुतण्याला ? याची चर्चा तर आहेच. मात्र, रोहित यांनी आजोबांच्या सल्ल्यानुसार स्वतःचे मैदान तयार करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

रोहीत पवार हे सध्या कृषी व्यवसायाशी निगडित असणाऱ्या बारामती ऍग्रो कंपनीची जबाबदारी सांभाळत आहेत, तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील काम पाहत आहे. पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.