सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव दिल्लीत कुठे अडकून पडला ? – पृथ्वीराज चव्हाण

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारने २०११ साली केंद्राकडे पाठवला होता. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी अधिक माहिती मागवली होती. २०१४ मध्ये आम्ही १ हजार पानांची अधिक माहिती पाठवली होती. दिल्लीत हा प्रस्ताव कुणी दाबून ठेवला हे शोधावे लागेल असे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनबंदीचा प्रस्ताव दाबून ठेवल्याप्रकरणी सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या तत्कालीन केंद्रीय गृह सचिवलयाकडे बोट दाखवले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जनसंघर्ष यात्रेसाठी पंढरपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

यासंदर्भात अधिक बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, सनातनवर बंदीचा प्रस्ताव आम्ही पाठवून दिला होता. त्यानंतर अधिकची माहितीही पाठवून दिली. मात्र दिल्लीत हा प्रस्ताव कुठे अडकून पडला याची कल्पना नाही. दिल्लीत गृहमंत्रालयात २०० अधिकारी आहेत. त्याच्याकडे कुठे ही फाईल अडकून पडली हे पाहावे लागेल. त्यावेळी जे केंद्रीय सचिव होते ते आज केंद्रीय मंत्री आहेत हे याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव का गेला नाही याची मला कल्पना नाही. सचिव, उपसचिव, अधिकारी पातळीवर प्रस्ताव कुठे दाबला हे पाहावे लागेल अशीही शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली.