भाजपच्या महिलांची आता ताईगिरी गेली कुठे? महापौर पेडणेकरांचा संतप्त सवाल

kishori pednekar vs chitra wagh

मुंबई : मुंबई येथील एका भाजप नगरसेविकेच्या कार्यलयात एक धक्कादायक घटना घडली असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. बोरिवली येथील एका भाजपा महिला नगरसेविकेच्या कार्यालयातच एका कार्यकर्त्याने एका महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात बुधवारी विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? दरवेळेला राज्याला बदनाम केलं जातं.

मी काही तरी वेगळं करते असे ताईगिरी दाखवता, पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गुपचिळी का? ताईगिरी करत होत्या त्यांचा फोन आता बंद असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे.

चाकणकर ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्र सुरक्षित नाही बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांना भाजपा पक्ष कार्यालयात महिलेने न्यायाची, मदतीची मागणी केल्यावर मदत सोडा! धक्का, बुक्की, शिव्या मिळाल्या. तक्रारकर्त्या महिलेला मारहाण करण्यात आली. आज बोरीवली पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात भाजपा कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित गुन्हेगारावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, भलेही ते कोणीही असोत! असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या