वीस वर्षांचा खासदार निधी कुठे गेला? – खा. इम्तियाज जलील

blank

औरंगाबाद – विकास कामांसाठी खासदाराला मोठा निधी मिळतो. मी खासदार झाल्यापासून गंगापूर, वैजापूरसह जिल्ह्यातील नागरिक निधीची मागणी करत आहेत. यापूर्वीच्या खासदारांचा गेल्या २० वर्षांतील निधी गेला कुठे? तुम्ही कामांसाठी माझीच वाट पाहत होते का? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता बुधवारी (ता. २९) केला.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत गणेश कॉलनी व अल्तमश कॉलनी येथे महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन बुधवारी उद्घाटन इम्तिजाय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे, नगरसेवक नासेर सिद्दिकी, अयुब जागीरदार, अब्दूल नाईकवाडी, अब्दुल अजीम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांची उपस्थिती होती. शिवसेना पदाधिकाऱ्यांना उद्देशून इम्तियाज जलील पुढे म्हणाले, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

‘घाटी’वरील ताण कमी करण्यासाठी २००  खाटांचे रुग्णालय शहरात झाले पाहिजे, म्हणून मी प्रयत्न केले; मात्र सात एकर जागा मिळू शकली नाही. महापौरांच्या भाषणाचा धागा पकडून श्री. इम्तियाज म्हणाले, तुम्ही म्हणता निधी आणा, मी खासदार होताच अनेक प्रस्ताव घेऊन नागरिक येत आहेत; पण यापूर्वी तुमच्या पक्षाचे २०  वर्षांपासून खासदार होते. त्यांच्या काळातील निधी कुठे गेला? सलीम अली सरोवराच्या विकासासाठी न्यायालयाचे स्थगिती आदेश उठविण्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही म्हणतात तेवढा निधी मी आणतो, असा शब्द इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. ते दोन दिवस शहराच्या पर्यटनवाढीसाठी बैठका घेणार आहेत.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या कार्यकाळात मोठी विकास कामे झाली. यामुळे खऱ्या अर्थाने शहराला अच्छे दिन आले आहेत. आता तुम्ही शिवसेनेच्या काळात काहीच कामे झाली नाहीत, असे म्हणू नका, असे आवाहन इम्तियाज यांना केले. चंद्रकांत खैरे यांच्या काळातच या रुग्णालयासाठी निधी मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मागच्या जागेवर मी बसतो, त्यांना पुढे जागा द्या

माजी खासदार चंद्रकांत खैरे व विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात नुकताच मुख्यमंत्र्यांसमोरच खुर्चीवरून वाद झाला होता. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, तुमच्या कार्यक्रमांना मला बोलावत चला. मी कुठेही बसेन, समोरचीच जागा पाहिजे, असा माझा कधीच आग्रह नसतो. ते तुम्हाला खूप प्रिय आहेत, मला माहीत आहे; पण मी खुर्चीच्या मागे पळणारा नाही, असा टोला इम्तियाज यांनी लगावला.

महापौरांना समजायला वेळ लागतो

महापौर नंदकुमार घोडेले असे व्यक्तिमत्त्व आहे, ते लवकर कोणाला समजत नाहीत, असा टोला आमदार प्रदीप जैस्वाल यांनी लगावला. शहर विकासासाठी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे मत श्री. जैस्वाल यांनी व्यक्त केले.