fbpx

निवडणुकीच्या काळात राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन : गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा : सध्यातरी कॉंग्रेसवर काहीसे नाराज असलेले सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घरी जाऊन भेट घेतली. ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली. मात्र या भेटी मध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून सुजय विखे हे त्यांच्या मेडिकलच्या कॉलेज संदर्भात आलेले होते असा खुलासा गिरीश महाजन यांनी या भेटी संदर्भात केला.

यावेळी महाजन म्हणाले की , विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने दुसऱ्या पक्षातच्या नेत्याच्या घरी जाऊ नये असं काही नाही. त्यामुळे सुजय विखे यांच्या बरोबर झालेली बैठक ही राजकीय बैठक नव्हती. तसेच गिरीश महाजन यांनी यावेळी शाब्दिक गुगली देखील टाकली महाजन म्हणाले की , निवडणुकीच्या काळात राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन आणि माझ्याकडचा पेशंट सहसा बरा होऊनच जातो.
त्यामुळे गिरीश महाजन यांनी या भेटी संदर्भात असे स्पष्टीकारण दिले असले तरी ही भेट राजकीय हेतू मनात ठेवूनच झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान अहमदनगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नगर लोकसभेच्या मुद्द्यावरून आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आले असता महाजन यांनी विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती.“आम्हाला कुणाचीही अलर्जीनाही. विखे पाटलांनी तिकिटाची मागणी केली, तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. आता कमळ हातात घ्यायचा का ? हा विखे पाटलांचा व्यक्तीगत प्रश्न आहे.”असं त्यांनी म्हटलं होतं.