पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सवाल

sharjeel

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला होता. भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मग आता ते पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

ते बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. भाजपने आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, तुमची तेवढी पात्रता नाही. बाबरी मशीद पडल्यानंतर सगळे येरेगबाळे पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे एकटे ठामपणे उभे राहिले. केंद्रात सहा वर्ष भाजपची सत्ता असताना राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपने कायदा केला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर आता भाजप राम मंदिराच्या नावाने वर्गणी गोळा करत आहे. मात्र, या सगळ्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार म्हणून भाजपलाच आपले नाव हवे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. याशिवाय इंधन दरवाढीवरुनही केंद्र सरकारवरही निशाणा साधला. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केलाय. यानंतर फडणवीसांनी पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्दावर प्रत्युत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या