न्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लोकपालांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होतं आहे. मात्र अद्यापही सरकारने लोकपालांची नियुक्ती न केल्याने, न्यायालयाने सरकारला लोकपालांची नेमणूक कधी करणार याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत . या संदर्भात सरकारला १० दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

कायद्यात दुरुस्त्या न करताही लोकपालांची नियुक्ती करण्यात काहीच अडचण नाही, असा निकाल न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. तरीही प्रत्यक्ष नेमणुकीच्या दृष्टीने काहीच हालचाल नसल्याने ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयीन अवमान याचिका दाखल केली आहे.

न्या. रंजन गोगोई व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी लोकपालांच्या नेमणुकीसंबंधी सरकारकडून त्यांना दिली गेलेली माहिती सादर केली. त्यावर न्यायालायाने असे निर्देश दिले की, सरकार नेमकी कोणती पावले केव्हा उचलणार आहे व लोकपाल केव्हा नेमले जाणार आहेत, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र १० दिवसांत सादर करावे.आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे.

दुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली