अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कधी? नांदेडमधील आणखी एका तरुण शेतकऱ्याने संपली जीवनयात्रा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय कधी? नांदेडमधील आणखी एका तरुण शेतकऱ्याने संपली जीवनयात्रा

farmer

नांदेड : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, सत्ताधारी असो की विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

कंधार तालुक्यातील गुंटूर येथील शेतातील बंधारा फुटून पाण्याने उभी पिके वाहून गेल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने सोमवारी (ता.१८) चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिगंबर तुळशीराम मुंडकर (३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गुंटूर येथील शेतकरी दिगंबर तुळशीराम मुंडकर यांच्या शेतातील बंधारा काही दिवसापूर्वी फुटून पाण्याने शेतातील पिके वाहून गेली. शेतीच्या उत्पन्नावरच उपजिविका उवलंबून असल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने मुलाचे शिक्षण आणि उपजिविका कशी भागवावी, या विवंचनेत शेतकरी मुंडकर हे सापडले होते. सोमवारी सकाळी ९ वाजता ते घराबाहेर पडले, त्यांनी शिवाजी आगलावे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती तुळशिराम मुंडकर यांनी कंधार पोलिस ठाण्याला दिली. त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या