शरद पवारांनी कृषिमंत्री असतांना स्वामिनाथन अहवाल का स्वीकारला नाही ?- माधव भंडारी

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी ‘स्वामिनाथन’च्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत ? असा प्रश्न भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उपस्थीत केला.

माधव भंडारी म्हणाले, कृषी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाची स्थापना भाजपच्या काळात झाली. त्याचा पहिला अहवाल २००४ मध्ये, तर दुसरा २००६ मध्ये आला. त्या वेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान, तर शरद पवार कृषिमंत्री होते. त्यावेळी त्यांनी हा अहवाल स्वीकारला  नाही ? मात्र सत्तेवरून पायउतार होताच अहवाल लागू करा, असे शरद पवार सांगत आहेत.

पहिल्यांदा त्यांनी हा अहवाल का स्वीकारला नाही, ते जाहीर करावे, असे मत भाजपचे राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे व्यक्त केले. कृषी उत्पादनाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून करू, असेही त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमासाठी श्री. भंडारी कोल्हापुरात आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.