…अन् काठ्या उगारणारे पोलिस लोकांसमोर चक्क हात जोडतात तेव्हा !

निलंगा : निलंगा शहरात संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावरुन विनाकारण फिरणा-या लोकांवर येथील पोलिस काठ्या उगारत नाही तर गुलाबाचे फुल देत अक्षरशः दोन्ही हात जोडून घराबाहेर न पडण्याची विनंती करताना दिसतात ! तेव्हा पोलिसांची ही आगळी वेगळी भूमिका पाहून नागरीकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. पोलिसांची ही अनोखी गांधीगीरी मात्र शहरात सध्या चर्चेचा विषय आहे.

शहरात संचारबंदी दरम्यान अनेकजण दुचाकी व चारचाकीमधून शहरात फिरत आहेत. संचारबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर येथील पोलिसांनी रस्त्यावरुन विनाकारण फिरणा-या अनेकांवर कठोर कारवाई केली आहे.या कारवाई दरम्यान अनेकांना काठीचाही प्रसाद मिळाला आहे.पोलिसांच्या या कारवाईचा रुग्ण व अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्यांनाही नाहक फटका बसला आहे.पोलिसांच्या या कारवाईबाबत मिडिया व नागरीकांमधून उलट सुलट चर्चा होत आहे. त्यातच जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक यांनी पोलिसांनी कारवाई करण्या अगोदर लोकांची चौकशी करुनच योग्य ती कारवाई करण्याचा नुकताच फतवा काढला आहे.

या पार्श्वभूमीवर लोकांना घराबाहेर येण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी एक नवीनच शक्कल लढविली आहे. लोकांवर काठी उगारुन दमदाटी करण्याऐवजी पोलिसांकडून चक्क गुलाबाचे फुल देवून प्रेमाच्या भाषेत सांगत आहेत.एवढेच नव्हे तर दोन्ही हात जोडून संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नका,प्रशासनास सहकार्य करा व आपण सर्व जण मिळून देशासमोरील करोनाचे युध्द जिंकू या अशी भावनिक साद नागरीकांना घालताना पोलिस निरिक्षक अनिल चोरमले, उपनिरिक्षक लक्ष्मण आकमवाड, प्रणव काळे, शितलकुमार शिंदाळकर, बाळासाहेब नागमोडे आदी पोलिस कर्मचारी दिसत आहेत.