मावळच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट, अप्पा आणि भाऊ भेटले !

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणूकीमध्ये मावळ मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हे रिंगणात उतरले आहे. परंतु श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे नाराज आहेत. मात्र आज श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांची भेट झाली असून दोन्ही कट्टर विरोधकांमध्ये दिलजमाई झाल्याचं दिसत आहे. आज पिंपळे गुरव येथील जगताप यांच्या ‘चंद्ररंग’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली असून यांच्यामध्ये सुमारे पाऊन तास राजकीय खिचडी शिजली आहे.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मावळच्या राजकारणाबाबत चर्चा झाल्याचं सूत्राकडून कळत आहे.  मात्र नेमक कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली. कशाप्रकारे चर्चा झाली हे मात्र गुपित ठेवण्यात आलं आहे. परंतु या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कट्टर विरोधकांची भेट होणे ही मावळच्या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी उलथा पालथ आहे.

दरम्यान, श्रीरंग बारणे यांना मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे आव्हान असणार आहे. तसेच शिवजयंती वेळी पिंपरी चिंचवड येथे लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांची भेट झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत मावळ मधून नाराज भाजप आ. लक्ष्मण जगताप हे पार्थ पवार यांना पाठींबा देणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज या युतीच्या नेत्यांमध्ये भेट आणि चर्चा झाल्याने मावळच्या राजकीय लढत आणखी रंगतदार होणार आहे.