परळीसाठी मी जीवाची बाजी लावत असताना पालकमंत्र्यांनी खिळ घालण्याचे पाप केले- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा  : परळीच्या विकासासाठी मी जीवाची बाजी लावुन प्रयत्न करीत असताना भाजपच्या पालकमंत्र्यांनी मात्र परळीच्या विकासात खिळ घालण्याचे पाप केले आहे. कितीही अडचणी आल्या तरी परळीचा चेहरामोहरा मला बदलायचा असून, त्यासाठी रस्त्यांसाठी 138 तर नाल्यांसाठी 140 कोटी रूपये मंजुर केल्याचे व 1500 नविन घरकुल देण्याचा शब्द विधान परिषदेचे धनंजय मुंडे यांनी दिला.

बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शहरातील आझादनगर भागात झालेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते. परळीच्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी कोणतेही काम केले नसल्याने त्यांना मतदान मागण्याचा कसलाही अधिकार नसल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी या सभेत सुनावले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, नगर परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने विकास कामात खोडा घालण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. विकासकामे रोखली, जाणीवपूर्वक विकासनिधी बांधकाम खात्याला वर्ग केला, मात्र बांधकाम खात्याकडूनही यांना काम करता आले नाही. परळीकरांवर माझा जीव आहे, विश्वास आहे, येणाऱ्या काळात परळी शहरात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही. मी राज्यभर फिरत असलो तरी, माझा जीव तुमच्यात आहे. उद्या महाराष्ट्रात जातोय आता जवाबदारी परळीकर जनतेची आहे, शहरातून सर्वाधिक आघाडी देऊन बजरंग सोनवणेंना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्र्यांनी परळी शहरासाठी केलेले एक तरी काम त्यांनी सांगावे असे आवाहन ही दिले.