fbpx

…जेव्हा पंकजा मुंडेना गर्दीतून त्यांची बालमैत्रीण आवाज देते !

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांचे व्यस्त प्रचार दौरे, विराट सभा, कार्यकर्त्यांचे गराडे, आणि राजकीय चिखलफेक या सगळ्यांत नेत्यांना समतोल राखणे मोठे जिकरीचे काम म्हणावे लागेल. अशात कार्यकर्ते आणि मतदार यांचे मन राखणे यामध्ये नेत्यांचे मोठे कसब पणाला लागते. अन अशातच जर तुम्ही एखाद्या पक्षाचे स्टार प्रचारक असाल तर हि जबाबदारी अजूनच वाढते. असाच एक किस्सा भाजपच्या स्टार प्रचारक आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत घडला.

पंकजा मुंडे या अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांची पाथर्डी येथील प्रचारसभा आवरून शिरूर कासार येथे सभेसाठी गेल्या असता त्यांना गर्दीतून असाच एक आवाज आला त्याचा किस्सा पंकजा मुंडे यांनी सांगितला आहे.

“शिरूर कासार येथील सभा संपल्यानंतर एक आवाज येतो ‘ओळखलं का ताई? मी त्या महिलेकडे पाहून लगेच विचारले ‘काय सुनीता काय चाललंय’? एवढ्या गर्दीत मला माझी 25 वर्षांपूर्वीची वर्ग मैत्रीण सुनीता डांगरे-साळी भेटली. माझी ती पाचवी ते दहावीची वर्ग मैत्रीण होती, मूळची परळीची आणि आत्ताचे सासर शिरूर कासार. 2 मिनिटाच्या भेटीत चर्चा झाल्यावर मैत्रिणीने घरी येण्याची विनंती केली. घरी येण्याची विनंती तात्काळ मान्य करून सुनीताला गाडीत बसवून मी मैत्रिणीच्या घरी पोहचले आणि चहा घेऊन घरच्यांची विचारपूस केली. आम्ही दोघीनी शाळेतल्या भरपूर आठवणी जाग्या केल्या.”