मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंना विचारले असता, म्हणाले…

eknath shinde

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचाचं मुख्यमंत्री असणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असणार यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत महाविकासआघाडी बबत चर्चा झाली. तर मुख्यमंत्री पदी कोणाला विराजमान करायचे याबाबतही चर्चा सुरु आहे. सर्व आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली आहे. तर उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असतील असे आमदारांकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे बोलणार तो आम्ही शब्द पाळणार अशी आमची भूमिका असणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. तसेच सर्व आमदारांना मुंबईत एकत्र राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण कधीही अचानक बोलावण्यात येऊ शकत, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक चर्चा बैठकांनंतर तीनही पक्षांचे सत्ता स्थापनेच्या मुद्यांवर एकमत झाले आहे. शिवसेनेला सर्वाधिक मतं असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला फायनल झाला असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या