… जेव्हा अादिवासी भागातील मुले हातात घेतात सचिनची १०,००० धावा केलेली बॅट

पुणे : अंघोळीची गोळी संस्थेने आयोजीत केलेल्या मामाच्या गावाला जाऊया उपक्रमांतर्गत अकाेले तालुक्यातील अादिवासी भागातील मुलांना पुणे दर्शन घडवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत काल या मुलांनी क्रिकेटच्या वस्तुंचे प्रसिद्ध संग्रहालय ब्लेड्स आॅफ ग्लोरी तसेच शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडीला भेट दिली

यावेळी मुलांनी सचिन, लारा, विराट या दिग्गजांनी ज्या बॅटने मैदानावर गोलंदाजांची धुलाई केली आहे त्या प्रत्यक्ष पाहिल्या. तसेच जे शुज घालुन शोएब अख्तर, ब्रेट ली १६० किलोमीटर प्रतितासाने गोलंदाजी करायचे ते शुज, मार्क बाऊचरच्या ज्या ग्लोजने यष्टीमागे अनेकांना यष्टीचीत केले ते ग्लोज मुलांना यावेळी प्रत्यक्ष पहायला मिळाले.यावेळी सचिनने ज्या बॅटने अनेक धावा केल्या आहेत अशी बॅट मुलांनी हातात घेऊन पाहिली.

जगातील भव्य दिव्य अशा क्रिकेट संग्रहालय अर्थात ब्लेड आॅफ ग्लोरीमध्ये विद्यार्थींच्या अनेक प्रश्नांना आयोजकांनी उत्तरे दिली. अदिवासी भागातील मुलांना हे क्रिकेट संग्रहालय खास अनुभवता यावे म्हणुन काल मुलांसाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता.

यानंतर २००८ साली ज्या क्रीडा संकुलात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्याला मुलांनी भेट दिली. यावेळी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचाही मुलांनी आनंद घेतला.या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असुन यावर्षी ११ मे ते १६ मे या दरम्यान हा उपक्रम राबवला जात आहे.

स्वप्न पहा आणि मोठे व्हा अशी काहीशी यावर्षीच्या कार्यक्रमाची थिम यावेळी ठेवण्यात आली आहे. यामध्ये या भागातील मुलांनी पुण्यात येऊन फक्त सहलीचा आनंद घेण्यापेक्षा त्यांना विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या जात आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १० मुले आणि १० मुली यावेळी पुण्यात आले आहेत. त्यांची रहाण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समीती, पुणे येथे करण्यात आली आहे.

यावर्षीच्या उपक्रमात नक्की नविन काय आहे याविषयी विचारले असता अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, यावेळी आलेली मुले ही अकोले तालुक्यातील जवळपास १० वेगवेगळ्या गावातील आहेत. ही अशी गावे आहेत जिथे अजून लाईटही पोहचली नाही. अनेक विद्य़ार्थी अशा शाळेत शिकत आहेत ज्या शाळेत आठवड्यात मुलांना केवळ १ ते २ तास शिकवले जाते.

अशा या मुलांना पुण्यासारख्या शहरात आणुन त्यांच्यात शिक्षण घेऊन मोठं होण्याची जिद्द निर्माण करण्याच काम आम्ही करत आहोत. आम्ही गेल्या दोन दिवसांत त्यांना शनिवारवाडा, राजीव गांंधी प्राणी संग्रहालय, ब्लेड्स अाॅफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय आणि बालेवाडी क्रीडा संकुल दाखवले आहे. दिनांक १३ मे पासुन संध्याकाळच्या सत्रात विविध मान्यवरांच्या कार्यशाळा तसेच मार्गदर्शन देणारे खास कार्यक्रम ठेवले आहेत.  असेही ते पुढे म्हणाले.

उद्यापासून या मुलांना पुण्यातील सिंहगड, लाेणीकंद येथील राज कपुर स्टुडिअाे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट, अायुका, फर्ग्युसन महाविद्यालय, चिंचवड येथील सायन्स पार्क, बर्ड व्हॅली या ठिकाणी सहल घडवण्यात येणार आहे.