WhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअरिंगची सुविधा

व्हाटसअ‍ॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून अँड्रॉइड, आयओएस व विंडोजच्या युजर्सला क्रमाक्रमाने हे फिचर प्रदान करण्यात येत आहे.

व्हाटसअ‍ॅपवर सध्या कुणीही युजर सीएसव्ही, डॉक, डॉक्स, पीडीएफ, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी, एक्सएलएस, एक्सएलएसएक्स, एमपी ४, एव्हीआय आदी फाईल्सचे फॉर्मेट शेअर करण्याची सुविधा आहे. तर अलीकडेच जीआयएफ अ‍ॅनिमेशन फाईल्स वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या (उदा. डब्ल्यूएफएस) मदतीने अन्य प्रकारच्या फाईल्स पाठविता येत असल्या तरी यालाही बर्‍याच मर्यादा आहेत. आता मात्र कोणत्याही फॉर्मेटमधील फाईल व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करता येईल. यामुळे अर्थातच व्हाटसअ‍ॅपवरून प्रसारीत करण्यात येणार्‍या माहितीला प्रचंड वेग येणार आहे. अर्थात यासाठी फाईलच्या आकाराचे बंधन घालण्यात आले असून आयओएसवर १२४, अँड्रॉइडवर १०० तर व्हाटसअ‍ॅप वेबवर ६४ मेगाबाईटपर्यंतच्या फाईल्सच फक्त शेअर करता येणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या सुविधेच्या अंतर्गत छायाचित्रे वा व्हिडीओ काँप्रेस न करता शेअर करता येतील. यामुळे उत्तम दर्जाच्या प्रतिमा व व्हिडीओजची देवाण-घेवाण शक्य होणार आहे. अँड्रॉइड, आयओएस व विंडोजच्या युजर्सला ही सुविधा मिळणार असून यापैकी काही युजर्सला हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहेत. व्हाटसअ‍ॅपबीटा या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले असून यानुसार व्हाटसअ‍ॅपच्या २.१७.३०च्या पुढील आवृत्तीत या प्रकारची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लवकरच व्हाटसअ‍ॅपच्या ग्रुपमधील सदस्यांच्या संख्येतही वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान दुसरीकडे व्हाटसअ‍ॅप भारतात केंद्र सरकारच्या युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपुर्वीच हाईक या भारतीय मॅसेंजरने युपीआयवर आधारित पेमेंट प्रणाली सुरू करून याबाबत व्हाटसअ‍ॅपला मात दिली आहे. या पार्श्‍वभूमिवर व्हाटसअ‍ॅप लवकरच या प्रणालीची घोषणा करू शकतो.