व्हॉटस्अ‍‍ॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज’

व्हॉटस्अ‍‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी ‘स्टोरीज’ या नवीन फिचरच्या माध्यमातून फोटो वा व्हिडीओला आपले स्टेटस म्हणून वापरण्याची सुविधा देणार आहे. आजवर कुणीही फक्त शब्द अथवा इमोजींना स्टेटस म्हणून वापरू शकतो. लवकरच यासोबत प्रतिमा अथवा व्हिडीओदेखील वापरता येणार आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा फोटो/व्हिडीओ फक्त 24 तासांपर्यंत स्टेटस म्हणून दिसेल. काही डेव्हलपर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी घेण्यात येत असून ते लवकरच जगभरातील युजर्सला अपडेटच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
सध्या फेसबुकच्या न्यूज फिडमध्ये व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होत असले तरी त्यात ऑडिओ सुविधा नव्हती. अर्थात आपल्याला ध्वनीरहित व्हिडीओ आपोआप सुरू होतांना दिसत असत. आता मात्र ध्वनीयुक्त व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होणार आहेत. बर्‍याच युजर्सला यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. अर्थात सेटींगमध्ये जाऊन हा प्रकार थांबविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
यासोबत फेसबुकने व्हर्टीकल व्हिडीओ अधिक उत्तम प्रकारे पाहण्याची सुविधा दिली आहे. अनेक जण स्मार्टफोनला उभ्याने धरून व्हिडीओ काढून तो शेअर करत असतात. यामुळे तो व्हिडीओ उभा दिसतो. फेसबुकच्या ताज्या अपडेटमुळे स्मार्टफोनवर हे व्हिडीओ सुलभपणे पाहता येणार आहेत.
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’ हे फिचरही दिले आहे. यामुळे आता फेसबुकवरील एखादा व्हिडीओ पाहतांना आपण न्यूज फिडही पाहू शकणार आहोत. आपल्या स्मार्टफोनच्या कोणत्याही कोपर्‍यात आपण हा व्हिडीओ ठेवू शकतो. अँड्रॉईड या प्रणालीचे युजर्स तर अगदी फेसबुकचे अ‍ॅप बंद असतांनाही अशा स्वरूपाचा व्हिडीओ पाहू शकतील. याचसोबत फेसबुकने टिव्हीवर उत्तम दर्जाचे व्हिडीओ पाहण्यासाठी स्वतंत्र टिव्ही अ‍ॅप सादर करण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅपल टिव्ही, अमेझॉन फायर टिव्ही आणि सॅमसंग स्मार्ट टिव्ही आदींसोबत फेसबुकचे व्हिडीओ अ‍ॅप जोडता येणार आहे.