fbpx

व्हाट्सएप ग्रुप सरसावला तालुक्याच्या विकासासाठी

व्हॉट्सॲप

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- पारनेर तालुक्यातील ध्ययवेड्या तरुणांनी राजकारण बाजूला ठेवत व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून अद्भुत विकासाची चळवळ गुणोरे गावातून सुरू केली आहे. तालुक्यातील निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी एकत्र येत पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनची स्थापना केली असून पारनेर तालुका विचार मंथनचे पहिले सत्र गुणोरे गावात संपन्न झाले. यावेळी तालुक्यातील अनेक गावातील उच्चशिक्षित तरुण उपस्थित होते. तळमळीने, ध्यासाने, विकासाच्या विचाराने पछाडलेले असे उच्च विद्याविभूषित शेतीतज्ञ, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, पत्रकार आणि काही अधिकारी यांचा समावेश असलेली पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनची मुहूर्तमेढ सर्वांनी मिळून तालुक्याच्या विकासासाठी रोवली गेली आहे.

यावेळी तरुणांनी बोलताना सांगितले की, सोशल मीडियावर गप्पा मारणारी अनेक लोक समाजात आहेत पन प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारी खूप कमी आहेत म्हणून आम्ही पारनेर तालुका विचार मंथन या व्हाट्सअप्प ग्रुपच्या बाहेर पडत पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून तालुक्याच्या विकासाची राजकारण विरहित मुहूर्तमेढ रोवण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे. यावेळी अनेक मुद्द्यांवर मान्यवर विचारवंतांनी विचार मांडले आणि विशेषतः संस्थेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे राजकारण न करण्याची जणू शपथच घेतली. तालुक्याबरोबरच निरनिराळ्या शहरातून तरुण या ठिकाणी जमा झाले होते.

राजकारणाच्या नादात तरुण पिढी बरबाद झाली आणि तालुक्यातील राजकारणाने तालुक्याचा विकास होऊ दिला नाही आणि तरुणाई मात्र उदासीन असू या गोष्टीची खंत व्यक्त करत आता मात्र न थांबता अविरहित काम सुरू करण्याचे ध्येय समोर ठेऊन शिक्षण, आरोग्य, मुलभुत सुविधा, कायदा, प्रबोधन अशा वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याचा ठराव पहिल्याच बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील रस्ते, आरोग्य, शिक्षणसंस्था व अन्य सर्व सद्य स्थितीची माहिती घेणे, तरुणांना उद्योजकता विकास या विषयात मार्गदर्शन करून प्रत्येक गावात एक तरी उद्योग उभा करणे, शेती पूरक शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच नवद्योजक निर्माण करणे, माहिती अधिकाराचा उपयोग करत प्रशासनाला काम करणेस भाग पाडणे, तरुणांचे प्रबोधन करत वाईट व्यसने व वाईट राजकारणापासून दूर करणे, हिमोग्लोबिन टेस्टिंग करून तालुक्यातील महिलांना ऍनिमिया मुक्त करणे, सी.एस.आर च्या माध्यमातून निधी उभा करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, महाराष्ट्रातल्या पहिल्या परिवर्तन ग्राम युवा परिषदेचे आयोजन करणे यांसह अनेक विषयावर काम करण्याचे ठराव घेण्यात आले.

यावेळी वडनेर येथील विकास वाजे यांनी सी.एस.आरच्या माध्यमातून एल & टी कंपनीच्या कौशल्य विकास योजनेची माहिती व फॉर्म दिले आणि तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गटेवाडी इथून आलेले अशोक पवार, गारगुंडी येथून आलेले पत्रकार प्रशांत झावरे, गुणोरेचे महेंद्र बढे व विकास वाजे यांनी लोकसहभागातून त्यांचे गावात केलेल्या कामांचा आलेख मांडला. देवा झिंजाड व सचिन भालेकर यांनी कृती कार्यक्रमाविषयी प्रस्तावना व संकल्पना मांडून नियोजन केले. डॉ.डुंगरवाल, डॉ.सचिन झावरे, डॉ.जगदाळे, देवा झिंझाड, मुंबईहून खास आलेले प्रशांत डेरे यांनी देखील आपले विचार मांडले. राजकारणाने युवक कसा भरकटतो आणि त्याने काय केले पाहिजे या बाबत सुंदर विवेचन करत दीपक मावळे यांनी सगळ्यांना स्तब्ध केले. सगळ्या मान्यवरांनी एकप्रकारे तालुक्याला वचन दिले की पुढील काळात विकासाचे एक नवे वादळ तालुक्यात नक्कीच येईल अशी खात्री ठेऊन सर्वांनी पुढील बैठकीसाठी गारगुंडी येथे भेटू असे सांगितले.