डिलिट फॉर एव्हरिवन’ व्हॉटसअॅप युजर्सला चूक सुधारण्याची एक संधी.

whatsapp

व्हॉटसअॅप आपल्या युजर्सला नेहमी अपडेटेड ठेवत असते. युजर्सच्या मागण्याचा विचार करून नवीन नवीन फिचर व्हॉटसअॅप मध्ये आणले जातात. अनेक वेळा चुकीचा मेसेज चुकीच्या ठिकाणी पाठविला जातो पण काही केल्या तो डिलीट करता येत नाही अशा वेळी खूप अवघड होऊन जाते पण आता लवकरच व्हॉटसअॅपचे चुकीचे मेसेज डिलीट करता येणार आहे.

डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर आले असून आता चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येणार आहे. ‘व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने’ दिलेल्या माहितीनुसार अँड्राईड, विंडोज आणि आयओएसवर हे फीचर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे युजर्स खूपच सुखावले आहेत.

व्हॉटसअॅप फायदेशीर ठरत असले तरी अनेकदा त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. कधीकधी आपण व्हॉटसअॅपवरून चुकून भलत्याच व्यक्तीला मेसेज किंवा फोटो पाठवतो. ती व्यक्ती आपला मित्र किंवा मैत्रिण असेल तर यामुळे निर्माण होणारा गोंधळ थोडक्यात निभावतो. मात्र, कुणा तिऱ्हाईत व्यक्तीला असा चुकीचा मेसेज गेल्यास वाईट अनुभव येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी चूक घडल्यानंतर हा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच डिलिट किंवा अनसेंड करता आला तर असा विचार अनेकांच्या मनात होता. याबद्दल अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. सप्टेंबर महिन्यात या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅपने केली होती आणि इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हे फीचर आता युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे.

अनावधानाने एखाद्या ग्रुपमध्ये किंवा व्यक्तीला मेसेज गेले तर सात मिनिटांच्या आत युजरला ते रिकॉल करता येणार आहे. फक्त टेक्स्ट मेसेजच नाही तर फोटो, डॉक्युमेंट, व्हिडिओ, जीआयएफ देखील रिकॉल करता येणार आहे. पण समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज लगेच वाचला तर मात्र युजरकडे मेसेज रिकॉल करण्याचा पर्याय नसेल.