WhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर सर्च करा इमोजी

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी इमोजी सर्च करण्याची सुविधा केली आहे. यासोबत लवकरच डार्क मोड हे फिचर येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कि-बोर्डच्या माध्यमातून आपण हव्या त्या इमोजीला वापरू शकतो. यासाठी आपल्या इमोजींचा साठा असणार्‍या भागात जावे लागते. आता मात्र यासाठी सर्च करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कि-बोर्डवर क्लिक केल्यानंतर इमोजीचा पर्याय आल्यावर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या स्मायलीवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण हव्या त्या इमोजीला सर्च करू शकतो. उदाहरणार्थ आपण हँड हा शब्द शोधल्यानंतर हाताशी संबंधीत सर्व इमोजी आपल्याला दिसू लागतील. यानुसार आपण विविध इमोजींना अचूकपणे शोधून त्याचा वापर करू शकतो.

व्हाटसअ‍ॅपने आपली २.१७.२४३ ही बीटा आवृत्ती नुकतीच सादर केली असून यात हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. मात्र यात आश्‍चर्यकारकरित्या आधीच्या बीटा आवृत्तीत देण्यात आलेली अल्बमची सुविधा काढून टाकली आहे. कदाचित आगामी आवृत्तीत याला पुर्णपणे लागू करण्यात येईल असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर लवकरच व्हाटसअ‍ॅपवर डार्क मोड हे फिचर येण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या स्मार्टफोन अ‍ॅपवर डार्क मोडची सुविधा आहे. याच्या अंतर्गत कुणीही रात्रीच्या वेळी ट्विटर अ‍ॅपच्या थीमला डार्क रंगात परिवर्तीत करून डोळ्यांना होणारा त्रास वाचवू शकतो. मात्र व्हाटसअ‍ॅपवर या प्रकारची सुविधा कॅमेर्‍यासाठी देण्यात येणार आहे. अर्थात याच्या मदतीने कमी उजेडात उत्तम दर्जाची छायाचित्रे काढणे शक्य होईल. अद्याप या फिचरबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी व्हाटसअ‍ॅपच्या डॉक्युमेंटेशनमध्ये याचा उल्लेख करण्यात आल्यामुळे आगामी आवृत्तीत हे फिचर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय व्हाटसअ‍ॅपने पाठविलेला मॅसेज डिलीट करण्याची सुविधा असणार्‍या रिसेंड या फिचरची चाचणी घेतली असली तरी अद्याप सर्व युजर्सला हे लागू केलेले नाही. यामुळे आगामी आवृत्तीत त्याची सुविधादेखील मिळू शकते.

You might also like
Comments
Loading...