शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार : निलेश राणे

nilesh rane

राजापूर – भावनिक राजकारण करून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने आपल्याला मागास ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला आडवं करा कारण शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकासाचं पर्व सुरू होणार नाही असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कोदवली केळवड-पाथर्डे येथे केले.

ज्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पात शिवसेनेला हाताशी धरून दलाली केली ते येथील वकिल जर गावात मस्ती करत असतील तर त्यांची मस्ती देखील या निवडणूकीत त्यांना घरचा रस्ता दाखवून उतरवा असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.कोदवली ग्रुप ग्रामपंचायतीमधील केळवडे-पाथर्डे येथे राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व उमेदवारांशी संवाद साधून कोदवली ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टिका केली. केवळ खोटे बालणे, पोकळ आश्वासने देणे आणि जनतेची दिशाभुल करणे हाच शिवसेनेचा कार्यक्रम आहे. शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार असा खडा सवाल उपस्थित करून राणे यांनी आपल्याला गावचा विकास करावयाचा असेल तर शिवसेनेला आडवं केले पाहिजे, जर तसे केलात तर विकास आपोआप आपल्या दारात येईल असेही राणे यांनी सांगितले.

केळवडे पाथर्डे रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला व त्यांच्या मुळे हा रस्ता मार्गी लागत आहे. आणि या रस्त्याच्या कामाचा नारळ आ. राजन साळवी वाढवून त्याचे श्रेय घेत आहेत. हेच काम शिवसेना आणि आ. साळवींनी आजपर्यंत केले आहे. कामं आंम्ही करायची आणि नारळ यांनी वाढवून श्रेय घ्यायचे हे आता थांबले पाहिजे. यांना आपण कधीतरी जाब विचारणार आहोत की नाहीत असा सवाल उपस्थित करून आजपर्यंत विकासापासून वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्याची हीच वेळ असून ती वेळ साधा आणि शिवसेनेला हद्दपार करा असे आवाहन राणे यांनी केले.

शिवसेनेचे मंत्री, खासदार आमदार निष्क्रीय आहेत, पालकमंत्री कधी जिल्हयात फिरकतच नाहीत, केंद्र सरकार योजना राबविते आणि श्रेय घेण्यासाठी शिवसेना धडपडते असा घणाघातही राणे यांनी केला. कोकणात चक्रीवादळ झाले, अतिवृष्टी झाली, अवकाळी पावसाने भातपिक वाहून गेले पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोकणात फिरकले नाहीत, रायगड बोटीने जवळ म्हणून तेथे येऊन गेले पण रत्नागिरीत नाही, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मग यांना का मते द्यायची हे यांना विचारा असे आवाहन राणे यांनी केले. ज्या मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेने मुंबईत राजकारण केले तो मराठी माणूस आज मुंबईतुन हद्दपार होत असून शिवसेनेला याचे काहीचं देणं घेणं नाही, आज परप्रांतिय २२ टक्के आणि मराठी माणूस १८ टक्के अशी मुंबईतील परिस्थिती आहे. त्यामुळे मराठी माणसाचा शिवसेनेला असलेला कळवळा बेगडी असल्याची टिका राणे यांनी केली.

कोरोना संकटात मुंबईत कोकणी माणूस मरणयातना भोगत होता, गावात येण्यासाठी त्याला यातायात करावी लागली. सत्तेत असूनही मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनने त्यावेळी काहीच केले नाही. हे एवढया लवकर विसराचे काय? असा खडा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आता शिवसेनेला पुर्णपणे उखडून टाकण्याची वेळ आली असून या निवडणूकीत ती वेळ साधा असे आवाहन राणे यांनी केले.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला. मात्र ९५ टक्के लोकांनी जमिनीचा मोबदला स्विकारल्याने आज या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातुन स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी शिवसेनेने काहंीच केलं नाही, उलट आता या ठिकाणी काम करणाऱ्या स्थानिक १८ युवाकांना नोकरीला मुकावे लागत असून त्या ठिकाणी परप्रांतियांनी ठेका घेतल्याचे राणे यांनी यावेळी निदर्शनास आणले. आता कुठे गेला मराठी माणूस आणि त्याचा कळवला. आमदार खासदार झोपले आहेत काय? असा सवाल राणे यांनी केला.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेच्याच लोकांनीे जमिन खरेदी विक्री व्यवहारात दलाली केली. मुख््यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच मावस भावानेच या परिसरात जमिनी घेतल्या आहेत. याच भागातील कावतकर यांनी यात दलाली करून त्यांना या जमिनींचे व्यवहार करून दिले आहेत. आणि आज तेच कावतकर शिवसेनेच्या जोरावर कोदवलीत दादागिरी करत आहेत. मात्र त्यांची ती दादागिरी आंम्ही खपवून घेणार नाही असा ईशारा देत शिवसेनेच्या या दलालांना या निवडणूकीत धडा शिकवा असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुशांत पवार, नारायण धांगड, यशवंत मांडवकर, दत्ताराम चव्हाण, कृष्णा धांगट, गंगाराम गुरव, बापू गुरव, रवींद्र गुरव आदींसह या भागातील भाजपा पॅनेलचे उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या