fbpx

मला विनाकारण टार्गेट केलं जात आहे – जिग्नेश मेवाणी

Jignesh_Mevani

टीम महाराष्ट्र देशा- माझ्या भाषणातील एक शब्दही प्रक्षोभक नव्हता. मात्र, तरीही भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा मेवाणी यांनी दिला. याशिवाय, मला एकदा पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यांना भेटायला जाताना मी मनुस्मृती आणि संविधानाची प्रत घेऊन जाईन. या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांसमोर ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे असल्याचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

भीमा-कोरेगाव प्रकरणी आपल्याला संघ आणि भाजपवाले हकनाक टार्गेट करताहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केलाय. आपण कुठलंही भडकाऊ भाषण केलं नाही. अथवा बंदला समर्थन दिलं नाही. तरीही मला विनाकारण टार्गेट करण्यात येतंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमा-कोरेगाव प्रकरणावर का बोलत नाहीत, असा सवालही मेवाणी यांनी केलाय. ९ तारखेला दिल्लीत युवा-हुंकार रॅली काढण्याची घोषणाही जिग्नेश मेवाणी यांनी केली. त्यानंतर संविधान आणि मनुस्मृती घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.