fbpx

व्यासपीठ:70 वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं?

india youth thinking about country

15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आज त्या गोष्टीला 70 वर्ष पूर्ण झाली. पण या 70 वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं? स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य रूजलं असं म्हणता येईल का?  भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ‘इंडियाज ट्रायस्ट विथ डेस्टिनी ‘नावाचं भाषण नेहरूंनी दिलं. भारताने नियतीशी केलेला करार म्हणजे स्वातंत्र्य. कित्येक वर्षाच्या गुलामगिरी नंतर हे स्वातंत्र्य मिळालं. आता जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत स्वातंत्र्य नांदेल स्वप्नही आम्ही रंगवली. त्याच्या शपथाही आम्ही वाहिल्या.

गेल्या 70 वर्षात हा करार आम्ही पाळला का? आज भारत एक अत्यंत गतिमान अर्थव्यवस्था आहे. जागतीकीकरणानंतर चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्था बऱ्याच सुधारल्या. अॅन्ड्र्यू हेवूड सारखा राजकीय तज्ज्ञ तर 21वं शतकं हे आशियातील राष्ट्रांचं शतक असेल असं म्हणतो. त्यातही मुख्य म्हणजे भारत आणि चीन. भारताची शहरं चमचमली आहेत. 1947 साली फाळणी नंतरची दिल्ली आणि 2017ची दिल्ली यात जमी आसमानाचा फरक आहे. भारताची साक्षरता ही 70 वर्षात सत्तरीच्या पार गेली आहे. आज या देशातले जवळपास 75 टक्के लोक साक्षर आहेत.हरित क्रांतीनंतर अन्न धान्याच्याबाबतीतही देश स्वयंपूर्ण झाला. अन्न धान्यासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांकडे जायची गरज आता उरली नाही. एक अत्यंत स्थिर लोकशाही म्हणून भारताची वाटचाल आहे.14 ऑगस्ट 1947ला जन्माला आलेल्या पाकिस्तानात 5 वर्ष पूर्ण लष्कराच्या दडपणाशिवाय राज्य करणारा पंतप्रधान अजून झालाच नाही. श्रीलंकेलाही तमिळ राष्ट्रवाद्यांच्या सिव्हील वॉरचा सामना करावा लागला. भारतात मात्र दर पाच वर्षांनी निवडणूका झाल्या. आणिबाणी वगळता कुठलीही राजकीय अस्थिरता या देशाला पूर्णपणे हेलावून सोडू शकली नाही.120 कोटीहून जास्त लोकसंख्या असलेला भारत नावाचा हा देश ताठ मानेने जगात उभा आहे आणि उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचालही करतोय.

स्वातंत्र्यानंतरची सध्याची तरूण पिढी ही भारतातली तिसरी युवा पिढी म्हणता येईल. 2020 साली जगातला सगळ्यात तरूण देश भारत असेल असं म्हटलं जातं आहे. पण आजची ही युवा पिढी नक्की आहे कशी? जागतिकीकरणानंतरची ही पहिलीच युवा पिढी आहे. फेसबुक ,ट्विटर माहित असलेली इंटरनेटचा प्रभावीपणे वापर करणारीही पहिलीच युवा पिढी आहे. या पिढीतही दोन भाग पडतात. एक ग्रामीण युवा पिढी आणि दुसरी शहरी युवा पिढी.आज ग्रामीण भारतातल्या तरूणासमोरचा सगळ्यात महत्तवाचा पेच रोजगाराचा आहे. अनेक तरूण या देशात सुशिक्षित बेरोजगार आहे. ज्यांना नोकऱ्या आहे त्यांना समाधानकारक पगार नाही. तरूणांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करण्यात या देशाची शासन व्यवस्था मोठ्या प्रमाणात अपयशी पडल्याचं दिसून येतं.

सरकारी नोकऱ्या मिळणं तितकं सोपं नाही. पारंपारिक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया असलेला शेती हा आज तोट्याचा व्यवसाय होऊन बसलाय. शेतकऱ्यांचा पिकांना देशभर योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे कर्ज फिटत नाहीत. पुरेसं पाणी पिकांना मिळत नाहीत त्यात दुष्काळ पडला तर बोलायलाच नको. आज मध्य प्रदेशपासून खाली तामिळनाडूपर्यंत सगळ्याच राज्यांमधले शेतकरी आज रस्त्यावर उतरत आहेत. हरियाणा पंजाब राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात ही असंतोष आहे. आणि या सगळ्यात रोजगार नसणारी युवा पिढी दिशाहीन होतेय.

आसेतू हिमाचल या युवा पिढीला रोजगारासाठी एकच तोडगा दिसतोय ‘आरक्षण’.म्हणून जाट गुर्जर पटेलांपासून मराठ्यापर्यंत सगळ्याच जाती आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे ज्यांना आरक्षण मिळालंय अशा मदिगा चमार या जातीही सुप्रिम कोर्टात भांडत आहेत.का? तर त्यांना एस.सी एस.टी कोट्यामध्ये प्राधान्य मिळावं म्हणून. एस.सी एस.टी कोट्यातून अनेक जाती आरक्षित आहेत. त्यात जेव्हा नोकऱ्या मिळतील तेव्हा मेरिट सोबतच आरक्षणातील इतर जातींच्या आधी आमच्या जातीच्या उमेदवाराचा पहिले विचार व्हावा अशी यांची मागणी. म्हणजे आरक्षण मिळालेल्यांनाही त्या आरक्षणाचा किती फायदा झाला? रोजगार नाही म्हणून ग्रामीण युवकाच्या मनात असंतोष आहे.

तर शहरी युवक? रोजगारासाठीची धडपड इथेही आहेच. पण इथे मात्र प्रश्न अजून वेगळे पडतात. भारताच्या शहरांमध्ये आता दारूच्या पाठोपाठ गांज्याचे सेवन वाढत असल्याचं म्हटलं जातंय. त्यातही तरूणांचा सहभाग मोठा आहे. शहरी तरूणाला स्वैरपणे जगायची इच्छा आहे.देशाच्या संस्कृतीतले प्रतिगामी विचार आज त्याला पटत नाहीत. म्हणून स्त्री मुक्तीच्या किस ऑफ लव्ह सारख्या चळवळी शहरांमध्ये दिसून येतात असे अनेक प्रश्न मांडता येतील. काही जण म्हणतील स्वातंत्र्य ही फक्त श्रीमंतांती मक्तेदारी आहे असंही म्हणतील. पण तसं खरंच आहे असं म्हणता येणार नाही. शेवट करताना मुद्दा घेतो गरीबीचा. 1952 पासून आतापर्यंत प्रत्येक निवडणूकीत गरीबी हाच प्रमुख मुद्दा होता. पण अजूनही गरीबीत किती फरक पडला? आजही भारतात गरीबांच प्रमाण प्रचंड आहे. तवलीन सिंह या पत्रकार आपल्या INDIAS BROKEN TRYST या पुस्तकात गरीबांसाठी बनवलेल्या योजना गरीबांपर्यंत कशा पोचत नाही हे अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलंय तेव्हा देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत व्यवस्था पोचत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला खरा अर्थ मिळणार नाही….हेच खरं

-एक विचारी तरुण