गर्भपातप्रकरणी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा काय करीत होती?- अॅड. वर्षा देशपांडे

abortion

सोलापूर : गर्भपातप्रकरण नागरिकांच्या मदतीमुळे उघडकीस अाले अाहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार अकलूजच्या डाॅ. तेजस गांधी यांच्या रुग्णालयात सुरू असताना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा काय करीत होती? असा सवाल लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अॅड. वर्षा देशपांडे यांनी केला. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या उपिस्थतीत गर्भचिकित्सा नियंत्रण समितीची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीत अॅड. देशपांडे यांनी थेट अारोग्य विभागाच्या यंत्रणेवर बोट ठेवले. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती मिळत नसल्याचा गंभीर अारोपही केला. अकलूज (ता. माळशिरस) येथे डॉ. तेजस गांधी यांच्या खासगी रुग्णालयात ३६ गर्भपाताची प्रकरणे समोर आली आहेत.

या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी अाढावा बैठक घेतली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी घटनेची माहिती सांगितली. जिल्हाधिकारी भोसले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस अधीक्षक, औषध प्रशासनास दिले.

२००५ मधील गर्भपात प्रकरणाचीही माहिती तातडीने सादर करण्यास सांगितले. अॅड. देशपांडे यांनी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरसह इतर जिल्ह्यातील अनेक गर्भपात डॉ. गांधी यांच्या रुग्णालयात झाले आहेत.