व्यासपीठ :लोक काय म्हणतील

what people think

‘लोक काय म्हणतील? काय बरं म्हणेल समाज? जाऊ दे नकोच!’ असं म्हणून आपली बरीच महत्वाची कामं, महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकतो किंवा रद्द करतो. पण खरं तर ‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार करायची तितकीशी आवश्यकताही नसते बऱ्याचदा. मी अमुक एक केलं तर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल? समाज मला काय म्हणेल? अशा अनाठायी विचारांमुळेच माणसाची प्रगती खुंटते. आपण अनेकदा म्हणतो की, ‘हा जन्म एकदाच मिळालाय, पुढचा जन्म कुणी पाहिलाय?’ असंच जर असेल तर याच जन्मात आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नकोत का पूर्ण करायला? अर्थातच हव्यात. हे नक्कीच मान्य करायला हवं की, प्रत्येकाच्याच सगळ्या इच्छा, स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं सोडणं हे एक प्रकारच्या नैराश्यतेचंच लक्षण आहे. या प्रकारात मुख्यत्वे लोक काय म्हणतील हाच विचार आपण करत बसतो. पण आपल्याला काय वाटतं हा विचारही व्हायला पाहिजे.

खरं तर लोक हे दुहेरी तोंडाचे असतात. मुलगा कामधंदा करत नाही म्हणूनही बोलतील आणि उद्या त्याच मुलाने कष्ट करून वडापावची गाडी टाकली तरी लोक बोलतील. त्याच मुलाने नोकरी केली तरी तिथूनही म्हणतील, ‘शेवटी चाकरीत करतो ना?’ खरंच लोकांचा प्रत्येक वेळी विचार करण्याची आवश्यकता नसते. पण केव्हा? तर आपण काही चुकीचं करत नाही आहोत अशी आपल्या मनाची निश्चिती असेल तोपर्यंतच! आता प्रश्न असाही येतो की, काय चूक आणि काय बरोबर हे ठरवणार कोण? समाज आणि त्यात राहणारे लोकच ना? पण इथे एक गोष्टही लक्षात ठेवायला पाहिजे की , समाजात राहायचं असेल तर त्यातले

नीतिनियमही पाळले जाणं महत्वाचं आहे. कारण ते नियम कुणा एका व्यक्तीने बनवलेले नसून त्या त्या काळात एक ‘समाज’ या नात्याने सर्व व्यक्तींनी मिळून बनवलेले आहेत. कदाचित काही नियम चुकीचे किंवा पूर्वीच्या रुढीनुसार असतीलही (उदा. बुरखा, तलाक, सती); पण समाज आणि त्याची मानसिकता बदलायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो.

प्रत्येक समाज हळूहळू काळानुसार बदलत असतो. अर्थात कोणत्याही कामांसाठी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल ह्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे समाजातील नीतिनियम धाब्यावर बसवणं नव्हे. समाजाच्या दृष्टीने गुन्हा किंवा अपराध ठरणारी वर्तणूक न करता चारित्र्यसंपन्न जीवन जगणही आवश्यक आहे. ‘माझ्या मनाला वाटलं म्हणून मी खून केला’ तर तो समाजाच्या दृष्टीने अपराधच आहे; खूनामाघचा हेतू चांगला की वाईट याला समाजाच्या दृष्टीने काहीही महत्व नसतं. हेतू कितीही चांगला असला तरी तो अपराध असल्याने शिक्षा ही घ्यावीच लागणार! फक्त शिक्षेची प्रखरता कमी-जास्त असू शकते. त्यामुळे अशा अनितीमान कामांत समाज काय म्हणेल याचा विचार कुठे तरी करावा लागतो.

प्रत्येक कामांच्या वेळी ‘समाज काय म्हणेल?’ याचा किंवा लोकांच्या कोणत्याही बोलण्याचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून मी पैसे मिळवण्यासाठी घरोघरी वृत्तपत्रं वाटल्यावर लोक काय म्हणतील, ते माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील याचा विचार केल्यास उपाशी मरावं लागेल. कारण हे बोलणारे लोक फक्त बोलतंच असतात; मदतीला कुणी येणार नाही. त्यामुळे अशा वेळी लोकांपेक्षा ‘मला काय वाटतं? अमुक एक काम चांगलं की वाईट?’ याचा विचार आपला आपण केलेलाच चांगला.

आकाश भडसावळे
भ्र. 8275442370