‘..यालाच गुजरात मॉडेल म्हणायचे काय?’, शिवसेनेचा ‘सामना’तून सवाल

sanjay raut

मुंबई: गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी काल शपथ घेतली. पण रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? यावरूनच शिवसेनेचे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाना साधत हेच का ते गुजरात मॉडेल असा खोचक सवाल केला आहे.

गुजरात राज्य जर विकास , प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते , तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली ? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे . भाकरी ही फिरवावीच लागते , पण एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे ‘ मॉडेल ‘ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते , तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की , मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात . भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे . वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत . पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे . गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? असा खोचक सवाल सामनातून संजय राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडला.

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले.

‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे. आता भूपेंद्र पटेल कोण? हे गूढच मानायला हवे. ते पटेल समाजाचे आहेत व गुजरातमधील पटेल समाज भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याने भूपेंद्रभाईंना मुख्यमंत्री केले. तसे पाहिले तर नितीन पटेलांपासून ते प्रफुल पटेल खोडापर्यंत अनेक ज्येष्ठ पटेल नेते तेथे होतेच. आमदारकीची पहिली टर्म आनंदीबेन पटेलांच्या पृपेने मिळवणाऱ्या, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री करण्याचे कारण काय? पण धक्के देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्रा’चा वापर झाला आहे. असेही सामनातून म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या