fbpx

जेऊर भुयारी मार्गाच्या मागे नेमकं दडलय काय?

करमाळा – एखाद्या गोष्टीच्या मागे काय दडलय हे माहिती करून घेण्यासाठी प्रत्येक जण खूप उत्सुक असतो, तसेच काहीतरी सध्या घडत आहे करमाळा तालुक्यातील जेऊर येथे.

जेऊर गावातील ७ वर्षांपुर्वी बंद झालेल्या रेल्वे गेटच्या जागेवर काही दिवसांपासून भुयारी मार्गाचे काम जोरदार सुरू होते परंतु अचानक हे काम बंद झाले आणि तर्कवितर्कांना सुरूवात झाली.

जेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून जेऊर गाव टेंभुर्णी-नगर या महामार्गावर आहे. तसेच जेऊरमध्ये रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहे. जेऊरमध्ये जानेवारी २०१२ पर्यंत रेल्वे मार्गावर रेल्वे गेट होते परंतु रेल्वे प्रशासनाने ते कायमस्वरूपी बंद केले, बंद झालेल्या रेल्वे गेट मुळे जेऊर गावचे दोन तुकडे झाले पुर्व आणि पश्चिम.

दोन्ही बाजूला ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जेऊर बायपासला उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. परंतु गावापासून दोन किमी लांब बायपास असल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या, अखेर जेऊर गावाचे आणि शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाठपुरावा करून बंद रेल्वे गेट मध्ये भुयारी मार्ग मंजूर केला आहे.

एक-दोन वर्षांनंतर या कामाला काही दिवसांपूर्वी जोरदार सुरूवात झाली काम लवकरात लवकर संपेल असे वाटत असताना शेवटी या कामावर विरजन आले आणि तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. हे काम शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी बंद पाडल्याचे आरोप विरोधकांनी केला आणि सगळीकडे खळबळ उडाली, ठेकेदाराकडे पैशांची मागणी केल्यामुळे हे काम बंद पडल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर भुयारी मार्गाचे रेल्वे प्रशासनाचे काम पुर्ण झालेले असून पुढील काम अकलूज येथील ठेकेदाराला दिलेले असून उर्वरीत काम लवकरच होईल असे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.

मग प्रश्न असा पडतो की नक्की हे काम बंद पाडले की पुढील कामासाठी बंद ठेवले.

शेवटी गावाचे हीत महत्त्वाचे असताना भुयारी मार्गात पण राजकारण येणे ही काही नवीन गोष्ट नाही. सध्यातरी भुयारी मार्गाच्या मागे दडलय काय? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.