मुंबई- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः राज्यात महिला सुरक्षित आहेत कि नाही असे विचारण्याची वेळ आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,वनमंत्री संजय राठोड,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमका हाच मुद्दा उचलत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे या सर्व मुद्यांवरून जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचा फायदा घेण्याचा भाजपचा मानस असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. चुकीच्या वीज बिलांमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे.
दरम्यान, या व अशा अनेक मुद्द्यांना जनतेच्या दरबारी मांडण्यासाठी अतिशय आक्रमकपणे जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या अभियानातपक्षाच्या संघटनात्मक रचनेतील 20 हजार शक्तिकेंद्रांच्या माध्यमातून 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.कोरोनामुळे आलेले सर्व निर्बंध पाळून हे अभियान राबविले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपकडून हे अभियान राबवून दुरावलेल्या मतदारांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे. रोज नवी प्रकरणे बाहेर येत असल्याने सध्या महाविकास आघाडी सरकार थोडे पिछाडीवर पडत असताना भाजप या छोट्या-छोट्या सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असे दिसत आहे.आता यात त्यांना किती यश मिळेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
महत्त्वाच्या बातम्या :
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले