योगी आदित्यनाथांचे मुख्यमंत्रीपद जाणार ? योगींच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अन्वयार्थ काय ?

yogi vs modi

नवी दिल्ली  – उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. ते येथे केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री योगी दिल्लीतील युपी भवनात गेले. येथे काही वेळ थांबल्यानंतर, ते गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानी गेले. येथे दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,योगी आदित्यनाथ यांच्या गेल्या काही महिन्यातील कामगिरीवर पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. कोरोना काळात नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मृतदेहांमुळे भाजपला चांगलाच टीकेचा सामना करावा लागला. यामुळेच योगींची मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाईल असे देखील अंदाज वर्तवले जात आहेत.

दरम्यान, काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत.  परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप देखील आता होऊ लागला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, हे असे आरोप होत असताना आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी योगींची ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः  भाजपकडून सर्व काही व्यवस्थित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. योगींनी अनेक विकासाची कामे केली असून त्यांना हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतले यामुळे योगी यांना मानणारा एक मोठा वर्ग देखील निर्माण झाला आहे. योगींची लोकप्रियता ही आजची नसून ते खासदार असल्यापासूनची आहे. एकंदरीत जातीय समीकरणे पाहता आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सध्या तरी योगींची खुर्ची जाणार नाही असाच अंदाज वर्तविला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP