ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली पवारांच्या निवासस्थानी बैठक होत आहे तो नेमका तरी काय आहे?

राष्ट्रामंच

 नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज सायंकाळी ४.०० वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस वगळून इतर विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलंय.

काल पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.मात्र, बैठकीपूर्वी ‘ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नसल्याचं’ स्पष्टीकरण देण्यात आलंय.

या बैठकीत राजकीय नेत्यांव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर काही प्रसिद्ध व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आलंय. दुसरीकडे या बैठकीत कॉंग्रेसचा एकही नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’च्या छत्राखाली होत असलेली ही बैठक कॉंग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 2018 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी हा मंच स्थापन केला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला रोखणे हाच या मंचाचा उद्देश असल्याचे देखील दिसून येत आहे. यामुळेच कट्टर भाजप विरोधक एका छात्राखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सुरुवातीला अनेक विरोधी पक्षांचे नेते या मंचात सामील झाले होते. समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, जेडीयूचे  माजी खासदार पवन वर्मा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा हे दोन नेते देखील मंचाचे सदस्य आहेत.

शरद पवार या मंचाचे सदस्य नाहीत, पण तरीही बैठक त्यांच्या निवासस्थानी होत आहे. राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या मंचाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. या मंचाच्या सदस्यांना भेटण्याची इच्छा पवारांनी एकदा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक होत असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या