नांदेड, माढाचं काय तर बारामती आणि साताऱ्यातही आम्हीच जिंकणार ; दानवेंना गाढा विश्वास

Raosaheb_Danve

टीम महाराष्ट्र देशा :  नांदेड, बारामती लोकसभा मतदार संघ भाजपलाच आले, सोबतच माढा आणि सातारा लोकसभा मतदार संघ पण आम्हीच जिंकणार असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. निवडणुक निकालाच्या संदर्भात ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४० जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचदरम्यान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, राज्यात महायुतीला ४५ जागा मिळतील. त्यापेक्षा एकही जागा कमी होणार नाही. असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

इतकेच नव्हे तर, नांदेड आणि बारामती लोकसभा मतदार संघ भाजापाकडेच आहे. शिवाय माढा आणि सातारा लोकसभा मतदार संघातही आम्हीच विजय मिळवणार आहोत असेही त्यांनी म्हंटले.

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचे त्यांनी म्हंटले.

नांदेड, बारामती, माढा, साताऱ्यासह महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे ४५ उमेदवार निवडून येतील, रावसाहेब दानवे यांना विश्वास, उद्याच्या निकालाची धाकधूक नाही, प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, दानवेंचा दावा.