राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाले तरी काय? आणखीन एकावर अत्याचाराचा आरोप

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. ही तरुणी त्यांची मेहूणी असल्याचा दावा करतेय. नातेवाईक असलेल्या या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गेल्या महिन्यांत अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेहमी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. राज्य आणि केंद्रात या प्रकरणी त्यांनी धोरण आखलेले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून तर मोदी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेत आवाज उठवून कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यास भाग पाडले आहे. मात्र, एकीकडे त्यांच्याच पक्षांच्या नेत्यांवर अत्याचाराचे आरोप होताना दिसतात.

मेहबूब शेख यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर आता बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देतो म्हणून शोषण केल्याचा आरोप धनजंय मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस तपास आणि न्यायालयात याबाबत सोक्षमोक्ष होईलच. पण पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर होणारे आरोप हे राष्ट्रवादीसाठी धोक्याचे लक्षण ठरणार हे मात्र निश्चित.

महत्वाच्या बातम्या