fbpx

Karnataka- 55 तासात नेमकं काय घडलं?

कर्नाटक

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला.

येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

सुप्रीम कोर्टाने कालच भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी काल दुपारची मुदत दिली होती.

भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता.

दुसरीकडे काँग्रेस 78 आणि जेडीएसने 38 = 116 जागांच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

त्यामुळे भाजप सरकार कोसळल्यामुळे, कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे. जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी हे नवे मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

येडियुरप्पांचा शपथविधी ते राजीनामा काय घडलं?

कर्नाटक विधानसभेसाठी 224 पैकी 222 जागांसाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा निकाल 15 मे रोजी जाहीर झाला.

या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 78, जनता दल (सेक्युलर) 37, बहुजन समाज पार्टी 1, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 आणि
अपक्ष 1 अशा जागा निवडून आल्या.

मात्र निवडणुकीनंतर लगेचच काँग्रेस आणि जनता दलाने एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. पण भाजपने सर्वात मोठा पक्ष असल्याने आपणच सत्ता स्थापन करणार असा दावा राज्यपालांकडे केला.

16 मे रोजी राज्यपालांचं भाजपला आमंत्रण

भाजपने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी बी एस येडियुरप्पा यांना विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर येडियुरप्पा यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला.

काँग्रेस आणि जेडीएस यांच्या 116 जागा म्हणजेच बहुमताचा 112 हा आकडा पार करत असूनही, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. 16 मे रोजी रात्री राज्यपालांनी तसं पत्र येडियुरप्पा यांना दिलं.

वाद मध्यरात्री सुप्रीम कोर्टात

सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला.

मात्र त्याचवेळी भाजपला समर्थक आमदारांची यादी सादर करा, असे आदेश देत पुढील सुनावणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 18 मे रोजी ठेवली.

17 मे रोजी शपथ

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी 9 वा. पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली. त्यावेळी येडियुरप्पांनी एकट्यानेच शपथ घेतली होती. उर्वरित मंत्र्यांची शपथ ही बहुमत सिद्ध झाल्यानंतर होणार होती.

18 मे रोजी सुप्रीम कोर्टाचा झटका

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी काँग्रेस आणि भाजपने आपआपली बाजू मांडली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने भाजपला राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत, उद्याच म्हणजे शनिवारी दुपारी 4 वा बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश दिला.

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे भाजपला मोठा धक्का होता.

19 मे – भाजप सरकार पडलं

मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची आज कर्नाटक विधानसभेत अग्निपरीक्षा होती. भाजपने बहुमत सिद्ध कऱण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. मात्र भाजपची डाळ शिजली नाही.

काल दुपारी कर्नाटक विधानसभेचं कामकाज दुपारी 3.30 नंतर सुरु झालं.

यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केलं. कन्नड भाषेतून केलेल्या भाषणात त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसवर टीका केली.

तसंच मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन असं ते म्हणाले.

येडियुरप्पांच्या भाषणातून ते समारोप किंवा निरोपाचं भाषण करत आहेत, हे दिसून येत होतं. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

1 Comment

Click here to post a comment