जालना : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत. वक्तव्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी सकाळी गांधी पुतळा चौकात दहन केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जालना जिल्हा व शहर कॉंग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रावसाहेब दानवे यांची जनआशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. रावसाहेब दानवे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर बेताल टीका करत आहेत. त्यासाठीच जन आशीर्वाद यात्रा काढण्य़ात येत आहे का, दानवे यांना राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करण्यासाठीच पदोन्नती दिली आहे का, असा सवाल यावेळी काँग्रेसने उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या विरोधात अशाप्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
बदनापूर येथील सभेत दानवे यांनी राहुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी सकाळी प्रा. सत्संग मुंडे, जाफ्राबाद तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांनी दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
राहुल गांधी देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे असून ते कोणत्याच कामाचे नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे केले. ‘एखाद्या देवाला आपण गोरे सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे?, असा प्रश्न दानवेंनी कार्यकर्त्यांना विचारला. त्यावेळी सांड असे उत्तर उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात दिले. त्यावर दानवे पुढे म्हणाले की, ते काय करते त्याला म्होरकी नसते, त्याला वेसण नसते. कुठे बांधायचे झाले तर त्याला ठिकाणाही नसतो. याचे कारण म्हणजे त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जाते आणि खाते. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या, खाऊद्या त्याला, ते तरी कुठे जाईल खायला. आणि खाऊन मग हा कसा लठ्ठ्या होतो.’ अशी टीका दानवे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना
- ‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटील