‘पूरग्रस्तांना तातडीची मदत अजूनही मिळाली नाही तर पॅकेजचं काय?,’ आशिष शेलार यांची टीका

ashish shelar vs uddhav thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत योग्य मदत करण्यासह दुरोगामी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, पूरग्रस्तांना सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. यासाठी निकष बदलून अधिक मदत करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी दिले होते. आता राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलंय.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

या पॅकेजचे महाविकास आघडीतील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी स्वागत केले आहे. तर, भाजपने या पॅकेजवर अनेक सवाल उपस्थित करत टीका केली आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर आणि टीकेवर प्रत्युत्तर देताना पॅकेजबाबत देखील भाष्य केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या 5 तारखेच्या नांदेड दौऱ्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत मलिक यांनी टिपण्णीवर शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मलिक हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. सरकार काम करत नसल्यानं राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहूनच काम करत आहेत,’ असं भाष्य करतानाच त्यांनी राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर, ‘ सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज जेव्हा जनतेपर्यंत पोहोचेल तेव्हा खरं. तातडीची मदत अजूनही मिळाली नाही तर पॅकेजचं काय?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या