आम्ही फक्त झेंडा बदलला आहे, आमची भूमिका तीच आहे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाअधिवेशनात पक्षाचा झेंडा बदलला. त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. औरंगाबाद इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी बोलताना त्यांना पक्षाचा झेंडा बदलल्या बाबत विचारण्यात आले. त्यावर बोलताना ते म्हणाले, आम्ही फक्त झेंडा बदलला, मात्र पक्षाची भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकार, बांगलादेशींना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. तर मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी देखील आम्हीच गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘ औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झाल्यास काय हरकत आहे, असा प्रश्न विचारत, चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत. असे म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे. राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असेहि त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हिंदू जननायक ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा, असं सांगतानाच, मला हिंदू जननायक म्हणू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं.