विंडिजच्या ब्रेथवेटची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार

Kraigg Brathwaite

एग्बस्टन : विंडिजचा सलामीवीर आणि फिरकी गोलंदाज क्रेग ब्रेथवेट याची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ब्रेथवेटने सहा षटके फेकून केवळ सहा धावा दिल्या. आता ब्रेथवेटला १४ दिवसांच्या आत गोलंदाजीच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, चाचणीचा निकाल येर्इपर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार आहे. ब्रेथवेटने कसोटी कारकिर्दीत एकूण १२ गडी बाद केले आहेत. त्यापैकी श्रीलंकेविरूद्ध त्याने एका डावात २९ धावांत ६ बळी टिपले होते. तसेच, इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी असलेल्या सध्याच्या विंडिजच्या संघात २ हजारांपेक्षा जास्त कसोटी धावा करणारा ब्रेथवेट हा एकमेव फलंदाज आहे.