fbpx

पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी, भाजप वाद विकोपाला

टीम महाराष्ट्र देशा :  ममता बॅनर्जी आणि भाजपचा वाद विकोपाला गेला असतानाचा, लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यात गेल्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस तसेच भाजपा यांनी एकमेकांवर आरोप करत आहेत.

दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनादरम्यान ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या. तसेच, यावेळी आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथे तणावपूर्ण वातावरण आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपामध्ये सुरू असलेला संघर्ष निवळण्याची चिन्हे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपाच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.