लग्नातील आहेराची पाकीटे चोरणारा तरुण गजाआड

कल्याण  : लग्नसोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आलेली आहेराची पाकिटे लंपास करणा-या चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली. ही मोहिम खडकपाडा पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने संयुक्तरित्या केली आहे. सद्दाम अबरार खान असे आरोपीचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. डिसेंबर महिन्यात कल्याणच्या वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रजापती कुटुंबीयांचा लग्नसोहळा सुरु होता.

यावेळी वधू-वराला मिळालेल्या भेटवस्तू आणि आहेराची पाकिटे अज्ञात चोरट्याने लांबवल्याचे समोर आले होते. लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगमध्येही स्टेजवर घुटमळताना हा चोरटा कैद झाला होता. याप्रकरणी प्रजापती यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेने कल्याण परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या आणखी घटनांच्या चित्रफिती तपासल्या.

त्यात एकच चोरटा सगळीकडे दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेमध्ये सद्दामला अटक करण्यात आली.

Comments
Loading...