fbpx

भाजप जो उमेदवार देईल त्यालाच निवडून देऊ, विजयदादा आणि निंबाळकरांनी केले स्पष्ट

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून राज्यातील बहुतांशी उमेदवारांची जागा वाटप झाले असले तरी माढा मतदार संघासाठी संभ्रम अजून कायम आहे. आघाडी कडून राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर माढाच्या उमेदवारीसाठी युतीकडून विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजीतसिंह निंबाळकर यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजीतसिंह निंबाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून या अफवा असल्याचं म्हणत भाजपचा जो उमेदवार असेल त्याला विजयी करून देऊ अस स्पष्ट केलं आहे.

यावेळी दोन्ही नेते म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही, त्यामुळे मला उमेदवारी देतील, असं वाटत नाही. उमेदवारीपेक्षा कृष्णा भीमा स्थिरीकरण होणं जास्त महत्त्वाचं असल्याचंही मोहिते पाटील म्हणाले. माढ्यातून भाजप देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु आणि त्याला निवडणून आणू, असं आश्वासन विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलं. तर भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील, ते जे सांगतील ते मान्य असेल, असं वक्तव्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केलं आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उद्यावर येवून ठेपली तरी युती कडून माढ्याचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. तर दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर हा तिढा अजूनच वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून विजयदादांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता या दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणाने आता युती नक्की कोणाला उमेदवारी देणार हा संभ्रम कायम आहे.