भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊ- मुख्यमंत्री ठाकरे

uddhav thakre

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ती कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत राज्यातील रस्ते प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या रस्त्यांची कामे करणाऱ्या तीन यंत्रणा कार्यरत आहेत. राज्यात सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची सुरु असलेली प्रकल्प त्यांना गती देण्यासाठी मंत्रालयस्तरावर मुख्य सचिव या प्रकल्पांचा नियमित आढावा घेणार असून त्यानंतर आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्र्यांसह दरमहा या प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह विभागीय स्तरावर महामार्गांच्या कामासाठी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबी सोडविण्यासाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी वडोदरा-मुंबई एक्सप्रेस मार्ग, अहमदनगर बायपास, रत्नागिरी-कोल्हापूर, कोल्हापूर-कागल, सांगली-सोलापूर, सुरत-नाशिक- अहमदनगर, अहमदनगर- सोलापूर- अक्कलकोट, पुणे-अहमदनगर- औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, नांदेड-जालना- अहमदनगर- पुणे अशा विविध महामार्गांच्या तसेच रिंग रोडच्या कामांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या