‘आम्ही स्वतंत्र पाहणी करू; सोबत येऊ नका’ प्रशासनाला माघारी पाठवत केंद्रीय पथकाची ग्रामीण भागात पाहणी

औरंगाबाद : कोरोनासाठीच्या शहर, ग्रामीण भागातील उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना प्रशासनाला केल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच काही अधिकारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, एक-दोन ठिकाणी पाहणी केल्यानंतर पुढील पाहणीसाठी ‘तुम्ही सोबत येऊ नका, आम्हाला स्वतंत्र करू द्या, अशा सूचना देत पथकाने पुढील पाहणी करत संबंधिताना दिल्या. दरम्यान, शनिवारी पूर्ण पाहणी झाल्यानंतर पथक आपले निरीक्षण नोंदविणार आहे.

केंद्रीय पथकाने गुरुवारी ग्रामीण भागाचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी मनपा हद्द, घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयांची व शनिवारी खासगी रुग्णालयांची पाहणी करून संध्याकाळी आपला अहवाल सादर करणार आहेत. दरम्यान, काल गुरुवारी, जिल्हा प्रशासनासोबत कोरोना उपाययोजना बैठकींनंतर पथकाने ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला. सर्वप्रथम त्यांनी बजाज-वाळूज या हॉटस्पॉट ठरलेल्या भागांची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत असलेल जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदवले यांनी पथकाला कामगार कल्याण केंद्राचे सीसीसी, बजाज विहार सीसीसी, वडगाव कोल्हाटी टेस्टिंग सेंटर, वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन पाईपलाईन पाहणी, लसीकरण पद्धत आदी बाबींची माहिती दिली. दरम्यान, यानंतर ‘आम्ही आमची स्वतंत्र पाहणी करू’ असे सांगून, जिल्हा परिषद अधिकारींना माघारी पाठवून पथक गंगापूरच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी सीसीसी केंद्रातील डॉक्टर्स, नर्स, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून अधिक माहिती घेत आवश्यक सूचना केल्या. लसीकरणबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली तसेच कंटेनमेंट झोनलादेखील भेटी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या